माझा धर्म
माझी आणि धर्माची तोंडओळख शाळेत झाली. शाळेच्या कोणत्या तरी कागदपत्रात माझ्या नावापुढे माझा धर्म हिंदू असल्याचे लिहिलेले. तेव्हा मला माझा धर्म हिंदू असल्याचा साक्षात्कार झाला. पुढे इतिहासाच्या पुस्तकात आणि इतर पुस्तकांतही माझ्या, म्हणजे हिंदू धर्माबद्दल बरेच काही वाचले. त्याशिवाय इतर धर्मांबद्दलही वाचनात आले. त्यामुळे माझा धर्म हिंदू असून इस्लाम, ज्यू, पारशी, खिश्चन असे अनेक धर्म जगात अस्तित्त्वात असल्याचेही कळले. त्यातलाच एक माझाही धर्म आहे, अशी माझी समजूत झाली.
जसजसे वय वाढू लागले तसतसा माझ्या मनात स्वतःच्या धर्माबद्दल जाज्वल्य अभिमान जागृत झाला आणि वाढू लागला. कोणत्याही सामान्य हिंदू मुलाला साधारणपणे वाटावा तसाच. मग मला असलेले ज्ञान मी दुसऱ्यांबरोबर वाटू लागलो. अर्थातच तेही माझ्यासारखे हिंदूच... ज्ञान हे वाटल्याने वाढते असे म्हणतात. त्याची मला याच काळात प्रचिती आली. मी जसे माझे ज्ञान दुसऱ्यासोबत वाटत होतो तसे तेही त्यांचे ज्ञान माझ्यासोबत वाटत होते. त्यामुळे माझ्या आणि त्यांच्याही ज्ञानात भर पडत होती. पुढे मला दुसऱ्या धर्मांबद्दल कुतूहल वाटू लागले. त्या धर्मात माझ्या धर्मापेक्षा वेगळे काय आहे हे, मला जाणून घ्यायचे होते. आता मी माझ्या ख्रिश्चन आणि मुसलमान मित्रांशी या बाबतीत चर्चा करण्याचा प्रयत्न करू लागलो. काहींनी या बाबतीत चर्चा करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. "आम्ही आमचे बघू, तुम्ही तुमचे बघा", असे काहींनी मला ऐकवले. पण काहींनी तशी चर्चा करण्याची तयारी दाखवली. चर्चा कसली, त्यांनी मला त्यांच्या धर्माबद्दल सांगितले. त्यातल्या काही गोष्टी आवडल्या आणि पटल्याही. किंबहुना बऱ्याच गोष्टी पाटल्या. उदाहरणार्थ, देव हा एकच असू शकतो. अनेक देव असूच शकत नाहीत, हे मला पटलं खरं. पण ते माझ्या धर्मातील अनेक देव असण्याच्या समाजाला तडा देणार होतं. या विचारांनी माझ्या मनात प्रचंड गोंधळ माजला. म्हणजे माझ्या पूर्वजांनी जोपासलेला पुरातन हिंदू धर्म हा खोटा आणि चुकीचा होता?.... या विचाराने झोप उडाली. छे! यात काहीतरी गोम नक्की होती. कुठेतरी मी अभ्यासात कमी पडत होतो. जर खोटा किंवा चुकीचा असता तर माझा धर्म एवढ्या काळासाठी अस्तित्वातच राहिला नसता. कुठेतरी काहीतरी चूक होत होती आणि ती सुधारायला हवी होती. पण त्यासाठी काय करावे हे समजत नव्हते.
हळूहळू मी युट्युब वर आंतर धर्मीय वादविवाद पाहू, ऐकू लागलो. यातील बहुतेक वादविवाद हे ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्यातील होते. हिंदू धर्माचे कोणीही अशा वादविवादात नसत. त्यामुळे तिथे हिंदू काही ज्ञान मिळायचा मार्ग बंद झाला. पण हे वादविवाद पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. वादविवादातील दोनही बाजू 'आमचाच धर्म कसा अंतिम सत्य आहे' हे सांगण्यात गर्क होत्या. मग सत्य काय होतं ? पुन्हा गोंधळ ..... प्रचंड गोंधळ. या वादविवादांतून एक गोष्ट मात्र मनात घर करून राहिली. सगळे म्हणत होते कि कोणताही धर्म समजून घ्यायचा असेल तर त्याच्या मूळ ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे. आता आली का पंचाईत! हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ कोणता समजावा? वेद, उपनिषदे, असंख्य पुराणे, भगवद्गीता असे अनेक ग्रंथ आहेत. यातील एकाचाही अभ्यास करायचा तर उभे आयुष्य वेचावे लागेल. पुन्हा गोंधळ....
यानंतर मी शक्य तसे या संदर्भातील वाचन करायला सुरुवात केली आणि एवढे वर्ष बंद असलेले डोळे हळूहळू उघडू लागले. शाळेत इंग्रजी शिकायला लागल्यापासून धर्म म्हणजे 'रिलीजन' असे आम्हाला शिकवले गेलेले. इतकं गोष्ट पुढील अनेक वर्षे मनावर बिंबलेली. पण हिंदू पुराणे, उपनिषदे, भगवद्गीता वाचताना कुठेच धर्म या शब्दाचा 'रिलीजन' या अर्थी वापर आढळलाच नाही. गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, "कर्माचे पालन करणे हाच तुझा धर्म आहे". महाभारतात धर्मराज म्हणून संबोधल्या जाणाऱ्या युधिष्ठिराने 'रिलीजन'साठी काहीही केलेले वाचनात आले नाही. अधर्मी रावण हाही मोठा शिवभक्त होता. म्हणजे 'हिंदू रिलीजन'चेच पालन करणारा होता. पण त्याने केलेल्या कृत्यामुळे तो अधर्मी झालेला. या सगळ्याशिवाय देव म्हणजे अंतिम सत्य आणि अंतिम शक्ती असल्याच्या दाव्यालाही हिंदू धर्माचे सगळे ग्रंथ तडा देत होते. एक सामान्य स्त्री असलेल्या अनुसूयेने ब्रम्हा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीला आपल्या ताकदीने स्तनपान करणाऱ्या अर्भकांच्या रूपात बदलले. आपल्या देवत्वाला अनुसरून न वागल्याने ब्रह्मदेवाला आपले देवत्व गमवावे लागले. त्याची कुठेही पूजा होत नाही. या सर्व गोष्टी एकाच दिशेने बोट दाखवत होत्या. मला माझा हिंदू धर्म म्हणजे एक 'रिलिजन' असल्याची शिकवण मिळालेली तीच मुळात चुकीची होती. माझा धर्म म्हणजे कधीच 'रिलीजन' नव्हता. तो फक्त धर्म होता. तो सत्कर्म, सद्विवेक, सद्वर्तन या बाबींवर बांधला गेलेला. माझ्या धर्मात मी कोणत्या देवाची किती मनोभावे पूजा करतो यावर काहीही अवलंबून नव्हते, तर मी किती सत्कर्म करतो आणि किती दुष्कर्म यावर मला मिळणारे फळ अवलंबून होते.
आता मला माझा 'रिलीजन' काय हे जाणून घेण्याची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे दुसऱ्या रिलीजनशी माझ्या रिलीजनची तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण माझा धर्म कोणता हे मला कळलंय.

छान लिहिलेस. अभिनंदन blog साठी आणी शुभेच्छा. लिहीत रहा.
ReplyDeleteधन्यवाद !
DeleteChhan lihile aahe
DeleteDhanyawaad!
DeleteVery beautiful. Thanks
ReplyDeleteThank you!
Deleteखूप छान. विचार पटले. भाषाशैली आवडली. मस्त.
ReplyDelete