साध्वी प्रज्ञा यांचं वक्तव्य


साध्वी प्रज्ञा यांचं वक्तव्य 




          साध्वी प्रज्ञा प्रचंड बहुमताने निवडून आल्या. काही महिन्यांपूर्वीच ज्या राज्यात भाजपचा पराभव झालेला त्याच राज्यातुन त्या निवडून आल्या हे विशेष. त्यांच्याबद्दल बरेच बुद्धिवादी बरंच काही बोलत आहेत. त्यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेली वक्तव्ये किती हिणकस आहेत, असा साधारण या बुद्धिवाद्यांचा सूर आहे. याबाबत मला काही प्रश्न पडले त्यांची उत्तरे मिळेनात म्हणून हा लिहिण्याचा प्रपंच...
            साध्वी प्रज्ञा यांच्यावर २००८ मधील मालेगाव बॉम्ब हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप ठेवला गेलेला. त्याच प्रमाणे त्यांच्यावर समझोता एक्सप्रेस बॉम्ब धमक्यांशी संबंध असल्याचाही आरोप होता. या दोन मोठ्या आतंकवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप ठेवून त्यांना पोलीस कस्टडीत ठेवण्यात आलेलं. तद्दन नऊ वर्षे! मोक्का कायद्याच्या आधारे. अशा प्रकारच्या एकाच प्रकरणात आरोपी असल्यास मोक्का लावता येत नाही. पण दोन असल्यास मोक्का लागतो, हे इथे नमूद करायलाच हवे. मोक्का लागलेल्या आरोपीला बेल मिळू शकत नाही. नऊ वर्षांनी २०१७ मध्ये त्यांच्या असलेला समझोता ब्लास्टचा आरोप मागे घेण्यात आला आणि त्यामुळे मोक्का हटवण्यात आला. म्हणजे नऊ वर्षे त्यांच्यावर मोक्का लावण्यासाठी कोणतेही पुरावे संबंधितांकडे नव्हते. असते तर लागलीच चार्जशीट दाखल करून खटला पुढे चालला असता. पण तसे झाले नाही. जाणून बुजून चार्जशीट दाखल केली गेली नाही. आता प्रश्न असा, कि या पार्श्वभूमीवर आयुष्याची नऊ वर्षे पोलीस कस्टडीत काढल्यावर एखादी व्यक्ती किती कटू होईल?
              आता त्यांनी हेमंत करकरेंवर केलेल्या आरोपांबद्दल. त्यात मानव अधिकार आयोगाला सबळ पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे ते आरोप फेटाळुन लावले गेले आहेत. पण मुद्दा असा आहे, कि हेमंत करकरे ज्या आरोपांखाली मोक्का लावून प्रज्ञा यांना कस्टडीत नऊ वर्षे काढायला लावली ते आरोपच आता राहिलेले नाहीत, हे सत्य विसरून कसं चालेल? याच आरोपांमुळे प्रज्ञा यांना नऊ वर्षे कस्टडीत काढावी लागलेली. मग त्याचा त्यांच्या मनात राग नसेल? नऊ वर्षे जर एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोलाही एका खोलीत डांबून ठेवले आणि नवरा स्वर्गवासी झाल्यावर त्या बाईला स्वातंत्र्य मिळाले तर ती बाईही स्वतःच्या नवऱ्याबद्दल असंच काहीतरी बोलेल नाही?... "माझे शिव्या शाप लागून मेला", असंच काहीतरी.... त्याला आपण भयानक, हिणकस असं काहीतरी म्हणू का? कि साध्वीने भगवी वस्त्रे गुंडाळली आणि स्वतःला साध्वी म्हणवले म्हणून ती जे बोलली ते हिणकस?
            आता एका शाहिदबद्दल अशी भाषा वापरली याबद्दल. आपल्या देशात अंधभक्ती हे एक सत्य आहे. सर्व जन कोणत्याही अपवादाशिवाय कोणत्या ना कोणत्या तरी व्यक्ती, विचारसरणी, इत्यादींची मनापासून भक्ती करतात. मग ती व्यक्ती कशीही असो! आतंकवाद्यांच्या गोळीने शहीद झाले ना... म्हणजे त्यांनी आयुष्यात जे काही केले ते सर्व बरोबरच असणार. मग हाच निकष आपण वेशीवर प्राण पणाला लावून लढणाऱ्या सैनिकाला लावतो का? त्या सैनिकाने वेशीवर आपल्या प्राणांचे बलिदान दिले म्हणून त्याने आयुष्यभरात जे काही केले ते सर्व बरोबर मानतो? नाही मानत... त्याने कोणता गुन्हा केला तर त्याला आपण गुन्हाच म्हणतो. त्याने जर एखाद्या स्त्रीला एखाद्या खोलीत डांबून ठेवलं तर त्यालाही आपण गुन्हाच मानू. तो वेशीवर शहीद झाला म्हणून त्याला त्या गुन्ह्यातून माफी मिळू शकत नाही. मग तोच निकष हेमंत करकरे यांच्याबद्दल का नाही. कारण करकरे प्रत्यक्षात नाही पण त्यांनी मांडलेल्या आरोपांमुळे साध्वी प्रज्ञाच्या नऊ वर्षांच्या यातनेला अप्रत्यक्षपणे जबाबदार नाहीत का? मग साध्वी प्रज्ञा यांच्या तोंडून करकरे यांच्याबद्दल जे शब्द निघाले ते हिणकस कसे?
            असो! हे मला पडलेले प्रश्न आहेत. ते सर्वांना पडतीलच असे नाही. पडावे असा माझा हेकाही नाही. पण प्रज्ञा यांच्या वक्तव्याला हिणकस, भयानक म्हणणाऱ्यांनी जरा याबद्दल विचार केला तरी पुरे. बाकी सर्व आलबेल!

               

Comments

Popular posts from this blog