पुरोगामी मी, प्रतिगामी मी

पुरोगामी मी, प्रतिगामी मी



                टीव्ही, वर्तमानपत्रांत अनेक वेळा पुरोगामी आणि प्रतिगामी हे शब्द ऐकलेले आहेत. मी सामान्य माणूस असल्याने मी पुरोगामी आणि प्रतिगामी या दोन शब्दांतील कोणत्या कोष्टकात बसतो हे जाणून घ्यायचा सातत्याने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला. अनेक वर्षांच्या वैचारिक वादळानंतर जेव्हा शांतता पसरली आणि धुराळा बसला तेव्हा लक्षात आलं. मी यातला कोणीही नाही. कारण मी एक सामान्य माणूस आहे. 
               या कोष्टकांमध्ये घालून सामान्य माणसाला भरडण्याचा प्रयत्न वर्षानु वर्षे झाला. इन फॅक्ट, जर तुम्हाला विचारवंत, बुद्धीवादी इत्यादी म्हणवून घ्यायचे असेल तर तुम्हाला 'पुरोगामी' या कोष्टकात बसणे भाग होते. वास्तविक सुरुवातीला मला या शब्दांचा अर्थच कळला नव्हता. सर्वधर्मसमभाव या शब्दाचे हे दोन्ही शब्द चुलत भाऊ असावेत, असा माझा समाज होता. पुढे थोडंफार वाचन केल्यावर त्यांचा अर्थ काळाला (असं मला वाटतं). तर पुरोगामी म्हणजे सुधारित विचारांचा आणि प्रतिगामी म्हणजे जुनाट, बुरसटलेल्या विचारांचा. पण यात गोम अशी, कि कोणता विचार पुरोगामी आणि कोणता प्रतिगामी हे ठरवायचा हक्क तुमच्याकडे एखाद्या पुरोगाम्याने दिलेले पुरोगामीत्वाचे प्रशस्तिपत्रक असेल तरच मिळू शके. थोडक्यात, पुरोगामीत्व हा एक सर्व बाजूंनी बंद असलेला 'रिलिजन'च होता म्हणा ना! यात एन्ट्री रेस्ट्रिक्टेड होती, अजूनही आहे. एकदा यात तुम्ही सामील झालात कि तुम्ही 'होलिअर दॅन दाउ' झालात. तुम्हाला काहीही करायची, बोलायची मुभा होती. का विचारताय? तुमची हिम्मत कशी झाली? तुम्ही प्रतिगामी आहात!
              असे बरेच वर्षे चालू होते. पण या दरम्यान मला कोणताही सामान्य माणूस दुसऱ्याला या शब्दांच्या मापदंडावर तोलताना दिसला, ऐकिवात आला नाही. कुठेही, "अशा प्रतिगामी विचारसरणीच्या माणसाला अमुक बोलायचा नैतिक अधिकार नाही" , असं काहीतरी सामान्य माणूस दुसऱ्याला बोलताना ऐकल्याचं आठवत नाही. म्हणजे हे शब्द मुळात सामान्य माणसाने तयार केलेलेच नाहीत. सामान्य माणसाचं या शब्दांशी काही घेणंदेणं नाही, असा मी एक निष्कर्ष काढला. तो खराही असावा. कारण तसं नसतं तर कुठे तरी कोणाला तरी इतरांशी बोलताना हे शब्द वापरताना कानावर पडले असते. हा! टीव्ही आणि वर्तमानपत्रांत मात्र हे शब्द सातत्याने ऐकत होतो, अजूनही ऐकतो. पण आता अधिसारखी त्यांची भीती वाटत नाही. हो, भीतीच! आधी आपल्याला कोणी प्रतिगामी तर म्हणणार नाही ना, अशी भीती वाटायची. प्रतिगामी म्हणजे आउटकास्ट, किंवा वाळीत टाकलेला असा काहीतरी माझा समज झालेला. डोक्यावर हा स्टॅम्प लागला तर एकटा पडेन कि काय, असे वाटायचे. कारण प्रतिगामी असल्याने अमुक संघटना व्यक्तीने काहीही केले तरी ते काहीतरी कुभांड असल्याची बोंबाबोंब टीव्हीवर व्हायची. अर्थात स्वयंघोषित पुरोगामी लोक्स तसे करायचे. थोडक्यात अशा पुरोगाम्यांची झुंडशाहीच माध्यमांवर चालायची म्हणा ना! त्यामुळे त्यांचा दरारा होता समाजात. 
              पण मी सामान्य माणूस, या गोष्टीशी संबंधच नसल्याने किंवा ठेवायचा नसल्याने, चार हात दूरच होतो. पुढे काळ बदलत गेला. कॉम्प्युटर, मोबाईल फोन, इंटरनेटचा जमाना आला. सोशल मीडिया मेन स्ट्रीम मीडियाला धोबी पछाड देऊ लागला. मूठभर बुद्धिवाद्यांच्या हातात असलेलं हत्यार माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या हातात आलं. आणि मग कळलं कि मी एकटाच नव्हतो. माझ्यासारखी करोडो माणसं होती जी वर्षानुवर्षे भीतीने या विचारवंत आणि बुद्धिवाद्यांपासून आणि त्यांच्या शब्दांपासून चार हात लांबच रहात होती. त्यांना आता वाचा मिळाली. स्वतःला बुद्धिवादी, विचारवंत, पुरोगामी इत्यादी म्हणवणाऱ्याना सामान्य माणूस भारी पडायला लागला. सेल्फ प्रोक्लेम्ड पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा 'सरे आम बीच बाजार में' धोपटला जाऊ लागला. 
               हळूहळू 'पुरोगामी' या खऱ्या अर्थाने उदात्त असलेल्या शब्दाला सामान्य माणूस हाडतूड करू लागला. यासाठी नाही कि त्याचं पुरोगामीत्वाशी काही वावडं होतं, तर यासाठी कि या शब्दाचा वापर करून विचारवंत आणि बुद्धिवाद्यांनी त्याला सातत्याने कमी लेखलेलं. सामान्य माणसाला अक्कल नसते किंवा तो झुंडीचा एक हिस्सा असतो असा आभास निर्माण केला गेलेला. त्यावरचा राग सामान्य माणूस सोशल मीडियाद्वारे बाहेर काढत होता. मग त्याची प्रचिती राजकारणातही यायला लागली. सामान्य माणसाला अक्कल नसते असा ज्यांनी आभास निर्माण केलेला त्यांचे राजकीय मायबाप राजकारणात धूळ चाटू लागले. सामान्य माणसाचा विजय होऊ लागला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालांनी त्यावर शिक्का मोर्तब केले. 
             अजूनही अशा स्वतःला 'पुरोगामी' म्हणवणाऱ्या वाचाळवीरांना अक्कल आलेली नाही. 'गिरे तो तंगडी उपर' अशा अविर्भावात आता ते लोकशाही धोक्यात असल्याची बोंबाबोंब करीत आहेत. पण आता त्यांना विचारतो कोण? कारण सामान्य माणूस आता तेवढा सामान्य राहिलेला नाही आणि ते तेवढे महत्त्वाचे नाहीत, आपण आपल्याला हवं ते कोणत्याही भीतीशिवाय करू शकतो हे सामान्य माणसाला आता कळलंय. सामान्य माणूस पुरोगामी नसतो आणि प्रतिगामीही नसतो. तो फक्त एक सामान्य माणूस असतो. त्याला तसंच असायला हवं. त्यातच लोकशाहीची शक्ती दडलेली आहे. 
         





Comments

Popular posts from this blog

साध्वी प्रज्ञा यांचं वक्तव्य